Friday, 19 January 2018

(अंध)श्रद्धा

व्हिवा सप्टेंबर २


‘चिन्मयी, अगं उठतेस ना? केवढी तयारी राहिलीये! आत्ता येतील पाहुणे. चल, तुझी रूम साफ करून घे. आणि हॉलमध्ये केवढा पसारा टाकलाय गं तुम्ही! एवढी मोठी झाली मुलं तरी माझ्या मागची कामं काही सुटत नाहीत. कधी जबाबदारीनं वागायला शिकणार कोण जाणे.’ मेधाताई पहाटेपासूनच कामाला लागल्या होत्या. त्यांचा दीड दिवसांचा गणपती. आज त्या निमित्तानं कितीतरी लोकांना त्यांनी फराळाला बोलावलं होतं. खरंतर कालच चिन्मयीची आणि त्यांची चकमक झडली होती यावरून. ‘आई, आपण गणपती बसवतो तरी कशाला? खरं सांग, कितीवेळ आपण गणपतीसमोर डोळे बंद करून मनापासून बसतो? आपल्या सगळ्यांचं लक्ष घर साफ करण्यात आणि ते सजवण्यात असतं. मेन्यू काय ठेवायचा, डेकोरेशनला फुलं कुठली आणायची, कुणाकुणाला बोलवायचं,... सगळी एनर्जी यातच जाते आपली.’ हा नेहमीच वादाचा मुद्दा असायचा दोघींच्यात. मेधाताई तशा श्रद्धाळू आणि चिन्मयी लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांची. ती पाचवीत असताना ते एकदा अष्टविनायक यात्रेला गेले. परत आल्यावर सगळ्यांना एक लेक्चरच दिलं तिनं. तिथली गर्दी, अस्वच्छता, जाण्या-येण्याचा त्रास हे सगळं सहन करून तिथे जाण्यात काय अर्थ आहे, असा तिचा प्रश्न होता. तिच्यासारखा विचार करणारे अनेक तरुण असतात. मासिक पाळीत बाजूला बसायचं, विधवांना हळदी-कुंकवाला बोलवायचं नाही, आईच्या हस्ते कन्यादान करायचं नाही अशा परंपरा कालबाह्य झाल्यात यावर त्याचा विश्वास असतो.


एकीकडे हे चित्र, तर दुसरीकडे तथाकथित साधू-संतांकडे रांगा लावणारे, परीक्षेच्या आधी हमखास पावणा-या देवांना नवस बोलणारे अंधश्रद्ध तरुण मुला-मुलींचे तांडे दिसतात. आमीर खानच्या ‘पी के’ सिनेमात दाखवलंय ना, कॉलेजच्या आवारात नुसता एक शेंदूर फासलेला दगड ठेवला तरी जातायेता मुलं पाया पडतात. सध्या तुरुंगात असलेल्या रामरहीमबाबाचंच उदाहरण घ्या. त्याच्या फॉलोअर्समध्ये अनेक तरुण होते. अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत तोडफोड, नासधूस करणारेही तरुणच होते. याला श्रद्धा म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धाच म्हणायला हवं.


एखाद्या गोष्टीचं वैज्ञानिक स्पष्टीकरण पूर्णपणे समजलं असेल तर श्रद्धा-अंधश्रद्धेचा प्रश्न उद्भवत नाही. उदा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याबाबतीत काही वेगळे समज करून घ्यायची गरजच पडत नाही. पण अशा कितीतरी घटना आहेत ज्यांना वैज्ञानिक एक्स्प्लेनेशन नाही. अशावेळी हे सगळे कन्सेप्ट्स उचल खातात. अंधश्रद्धा गरीब, निरक्षर लोक बाळगतात असा एक समज असतो. पण आपण आजूबाजूला पाहिलं तर उच्चशिक्षित, पैसेवाले लोकही यात खोलवर बुडालेले असतात.


अनेकांच्या मते अंधश्रद्धा आपल्याला असहाय बनवते तर श्रद्धा मनातली आशा जागी ठेवते. श्रद्धेत विवेक असतो तर अंधश्रद्धेत अविवेक. प्रयत्नांना मनोबल देण्याचं काम श्रद्धाच करते. आपल्या अवाक्यात आणि कुवतीत असलेल्या गोष्टी मनापासून आणि सर्व शक्तीनिशी करून मग मनात ‘आता चांगलंच होईल’ अशी श्रद्धा ठेवली तर काम फत्ते होण्याची शक्यता अधिक. फक्त यात मेख अशी आहे की या दोन गोष्टी केव्हा एकमेकांच्यात बदलतात याचा पत्ताच लागत नाही. आणि हे फार डेंजरस आहे. आता हेच बघा ना. ट्वीन टॉवर्सवर हल्ला करणारे, जगभर आतंकवाद माजवणारे दहशतवादी काय असतात? श्रद्धाळू कि अंधश्रद्धाळू? आपण म्हणणार की ती अंधश्रद्धा आहे. पण त्यांच्या मनात क्लीअर असतं ते हे का करताहेत ते. म्हणजे एखाद्याच्या मते ती अंधश्रद्धा असली तरी दुस-याच्या मते ती श्रद्धा असू शकते. दोन गोष्टी चांगल्या कि वाईट असा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्यांचे परिणाम काय होतायत हेही पाहिलं जातं. एखादा त्याची श्रद्धा आहे म्हणून बाहेर जाताना नेहमी देवाला नमस्कार करत असेल तर ते फक्त त्याच्यापुरतं रहातं. पण मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं जेव्हा लग्न ठरत नाही तेव्हा मात्र त्याचे परिणाम वैयक्तिक न रहाता सामाजिक होतात. म्हणूनच आपल्याला कुठलीही भूमिका घेण्याआधी नीट खोलवर विचार करायला हवा.


मागच्या पिढीपर्यंत डोळे मिटून आईबाबा सांगतील ते केलं जायचं. त्यात विचार-बिचार केलेला नसायचा. पण विज्ञानाचं बाळकडू मिळालेली आजची पिढी परंपरागत रूढींना आव्हान देतेय. प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असं तिचा सवाल असतो. देव, पूजा, नवस, यज्ञ अशा बाबतीत हा झगडा जास्तच तीव्र होतोय. काही रूढींना सबळ कारण असतं, काहींना आजिबात काही नसतं. काही रूढी काळाच्या ओघात इतक्या बदलल्यात कि त्यांच्या मूळ रूपापासून त्या शेकडो कोस दूर गेल्यात. आणि काही कर्मकांडं जस्टीफाय करण्याचा उगीचच ओढून-ताणून प्रयत्न केला जातोय. मग चांगल्या-वाईटातली ती सूक्ष्म रेषा ओळखण्याची किमया कशी करायची? रूढी-परंपरा श्रेष्ठ की विज्ञानाच्या कसोटीवर घासलेल्या प्रथा श्रेष्ठ? आणि विज्ञानाला तरी कळलंय का जगातल्या सगळ्या अद्भूतांमागचं सत्य?
या प्रश्नांना उत्तरं देणं सोपं नाही. आजच्या तरुणांसमोर या सगळ्याचा अर्थ लावण्याचं एक मोठं आव्हान आहे.


         

No comments:

Post a Comment

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...