Friday, 19 January 2018

हॅपी जर्नी

व्हिवा जुलै ३१


 शिखाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा गेल्या आठवड्यात अॅक्सिडेंट झाला. रात्री उशिरा एक काम संपवून ती परत येत होती. रेड सिग्नल लागला म्हणून ती थांबली तर मागून जोरात येणा-या गाडीनं तिला धडक मारली. डॉक्टर म्हणाले की तिनं हेल्मेट घातलं होतं म्हणून ती वाचली. पण पाय फ्रॅक्चर झाला. तातडीनं ऑपरेशन करायला लागलं.

पेपरमध्ये आलेल्या दुस-या एका बातमीतली मुलं मात्र तितकी नशीबवान नव्हती. पार्टी मूड मध्ये असलेल्या त्या दोन मुलांची तुफान वेगात असलेली कार वाटेतल्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की दोघेही वाचू शकले नाहीत.

रोज पेपर उघडला की अॅक्सिडेंटची एकतरी बातमी वाचायला लागते. बहुतेक अॅक्सिडेंटस पहाटेच्या वेळी होतात. आणि तुमच्यासारखे तरुण त्यात बळी जातात. बातमी वाचून आपण हळहळतो, चुकचुकतो आणि विसरून जातो. कित्येक डीटेल्स आपल्याला कधीच समजत नाहीत. नक्की काय झालं? टाळता आला असता का तो अपघात? हेल्मेट घातलं होतं का? स्पीड लिमिट पाळलं होतं का? गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होते का? दारू प्यायली होती का? कुणाशी विनाकारण स्पर्धा चालू होती का? रात्रीचा प्रवास टाळून नीट झोप काढून सकाळी निघता आलं असतं का? का होतात अपघात रात्रीच्या वेळी जास्त? उलट तेव्हा रस्त्यावर गर्दी कितीतरी कमी असते.


 कोणत्याही सिग्नल वरचं दृश्य घ्या. अनेक शूरवीर लाल सिग्नलला थांबण्याचे कष्ट न घेता झपकन जात असतात. पिवळ्या सिग्नलमधून वेगात गाडी काढत असतात. चुकूनमाकून थांबलेच असतील तर त्यांचा हॉर्नवरचा हात काही निघत नाही. तिथे थांबलेले सगळे येडे आहेत अशा नजरेनं ते लोकांकडे तिरस्कारानं पाहत असतात. आणि तो सिग्नल हिरवा झाल्या झाल्या हॉर्न वाजवून सुटायची किती घाई!
सिग्नलला थांबण्याचे इतके कष्ट का वाटतात आपल्याला ? एरवी तासनतास वेळ वाया घालवणारे आपण काही सेकंदांसाठी एवढे अस्वस्थ का होतो? आमच्या युथ क्लब मध्ये जेव्हा याविषयी चर्चा झाली तेव्हा सुरुवातीला सगळ्यांची उत्तरं ‘पोलीटीकली करेक्ट’ या प्रकारात मोडणारी होती. आपण कसे नेहमी सिग्नल पाळतो हे प्रत्येकजण हिरीरीनं सांगायला लागला. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, ‘ए, पण रस्त्यावर कुणी नसेल तर कशाला थांबायचं उगीच? नीट इकडे तिकडे बघून गेलं कि झालं.’ कुणीतरी असं म्हणायची वाटच बघत होते सगळे. लगेच बहुतेकांना ते पटलं. ‘बरोबर आहे, रात्रीच्या वेळी कारण नसताना चालू ठेवतात सिग्नल, तेव्हा कुणीच नसतं रस्त्यावर, उगीच वेळ वाया जातो’
एकूणच रहदारीचे नियम आपल्याला त्रास देण्यासाठी बनवलेले असतात असं बहुतेक तरुणांचं ठाम मत असतं. मग ते हेल्मेट घालणं असो, कागदपत्र बाळगणं असो की स्टॉप लाईनच्या मागे थांबणं असो. वन वेज आणि नो एन्ट्रीज तर फारच अडचणीच्या. आणि नेमका आपल्याला उशीर झाला कि सगळे सिग्नल लाल लागणार हे ठरलेलं.


न्यू इअर च्या रात्री नाक्या नाक्यावर पोलीस उभे असतात ते का? कारण कुठलीही पार्टी म्हणजे अल्कोहोल पिणं हा नॉर्म झालाय. काहीवेळा इतर ड्रग्जही घेतले जातात. अमलाखाली आपला ब्रेन कसा काम करेल? वर मूडही मस्तीचा असतो. एकमेकांशी गप्पा मारत, रेस लावत कशाही गाड्या चालवल्या जातात. शक्य तितके ट्रॅफिक रुल्स इग्नोअर केले जातात. साहजिकच अॅक्सिडेंट्स जास्त होतात.
 घाई तर नेहमीच असते आपल्याला! पण दर वेळी असं स्वत: अनुभव घेऊन पहायचं का? एखादी वेळ अशी येते की या घाईची जबर किंमत चुकवायला लागते.
मोडलेली गाडी दुरुस्त करता येते. अगदीच नाही तर नवीन घेता येते. पण मोडलेलं शरीर दुरुस्त करणं नेहमीच शक्य होतं असं नाही. त्यात वेळ, पैशाचा चुराडा तर होतोच शिवाय मानसिक आणि भावनिक त्रास होतो तो वेगळाच. आणि जीव गेला तर? तो दुसरा कुठून आणायचा?



शिखाच्या कॉलेजमध्ये या प्रसंगानंतर ट्रॅफिक पोलिसांनी एक वर्कशॉप घेतलं. अपघात झालेली ती मैत्रीण मुद्दाम व्हील चेअरवर आली होती. जे सगळे रुल्स अननेसेसरी वाटतात ते मोडले तर काय काय होऊ शकतं यावर काही रोल प्लेज झाले. चौकात बसवलेले सिग्नल्स किती विचार करून बसवलेले असतात, त्यासाठी किती काळजीपूर्वक प्लानिंग केलेलं असतं ते पोलिसांनी सांगितलं. रस्ता रिकामा आहे म्हणून गाडी सुसाट सोडण्याचे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात हे काही फिल्म क्लिप्स मधून दाखवलं. रात्रीच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी तेही सांगितलं. शेवटी अगदी शाळेत घेतात तशी सगळ्यांनी ट्रॅफिक रुल्स पाळण्याची शपथ घेतली. शिखा, तिची मैत्रीण आणि इतर ब-याच मुलांनी ट्रॅफिक अवेअरनेसचा हा वसा पुढे न्यायचा ठरवलाय. 

       

अॅनिमिया

व्हिवा जुलै १४


A woman taking photos of a lake, surrounded by trees with orange and yellow leaves in herastrau parkसौम्या कॉलेजमधून आली आणि थकून पडून राहिली. काही करावंसंच वाटत नव्हतं तिला. असं का होतंय? जरा काही काम केलं की अगदी गळून जायला होतंय. परीक्षा जवळ आलीये, अभ्यास करायला हवा हे कळतंय, पण इतकी झोप येते की होतच नाही अभ्यास. गेले काही दिवस तर पिरियड्सही वेळेवर येत नाहीयेत. आता मात्र तिला काळजी वाटायला लागलीये. आपल्याला काहीतरी मोठा आजार झालाय का?  कॅन्सरबिन्सर तर नसेल? नुकतेच शेजारचे काका कॅन्सरनं गेले. त्यांना असंच कायकाय होत होतं. घरच्या सगळ्यांच्या, मैत्रिणींच्या लक्षात आलंय तिचं बदललेलं रुटीन. ‘काय होतंय तुला नक्की?’ या त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे सौम्याला कळत नाहीये. तिला काही ताप येत नाही, उलट्या-जुलाब होत नाहीत की सर्दीखोकला नाही. तिची मावशी तर म्हणाली काहीतरी मानसिक असेल म्हणून. ‘बॉयफ्रेंडशी भांडण झालंय का? की ब्रेकअप वगैरे झालंय?’ ‘काहीतरीच काय गं मावशी? भांडण आणि ब्रेकअप व्हायला बॉयफ्रेंड असायला तरी हवा ना आधी!’ सौम्या वैतागून म्हणाली.
 शेवटी आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासून त्या म्हणाल्या की सौम्याला अॅनिमिया झालाय. म्हणजे तिच्या अंगातलं रक्त कमी झालंय. त्यांनी ती काय आणि किती खाते याची चौकशी केली, काही तपासण्याही करायला सांगितल्या.


 अॅनिमिया हा खरंतर आजार म्हणण्यापेक्षा एक लक्षण आहे. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन असतं. ते बनण्यासाठी आयर्न आणि प्रोटीन्स लागतात. आहार अपुरा असेल तर यांचा सप्लाय कमी होतो आणि  अॅनिमिया होतो. काही कारणानं अंगातून रक्त निघून जात असेल तरी असं होऊ शकतं. उदाहरणार्थ आपल्या देशात पोटात जंत होण्याचं प्रमाण खूप आहे. हे जंत आतड्याला छोट्या जखमा करतात. त्यामुळे आपलं रक्त हळूहळू कमी होऊ शकतं.


 पण किशोरवय आणि तरुणपण हा काळ तर सगळ्यात फिट असण्याचा! चांगले धडधाकट असतो आपण. तेव्हा कसा होईल अॅनिमिया? दुर्दैवानं तो होतो. आपल्या भारतात तर पन्नास टक्क्यांहून अधिक तरूणांना अॅनिमिया असतो. अनेक कारणं असतात त्याला. या वयात आपल्या शरीराची वाढ इतक्या वेगानं होत असते की नेहमीच्या आहारातून मिळालेले घटक पुरे पडत नाहीत. थोडक्यात डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी स्थिती! त्यातून खाण्याची वेगवेगळी फॅड्स या वयात चालू होतात, बाहेर खाण्याचं प्रमाण वाढतं. आहारात जंक फूड जास्त जाऊ लागतं. ब्रेकफास्टवर काट मारली जाते. साहजिकच आयर्न, प्रथिनं, जीवनसत्त्व कमी पडतात. आणि हिमोग्लोबिन कमी होऊन अॅनिमिया होतो. मुलींमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याला काही अॅडीशनल कारणं असतात. अनेक मुली आवश्यकतेपेक्षा कमी खातात. काही वेळा वजन कमी करण्यासाठी तर काही वेळा नाईलाज म्हणून. मुलींनी, स्त्रियांनी उरलंसुरलं, शेवटी खायची पद्धत अजूनही अनेक घरात असते. शिवाय दर महिन्याला पिरीयड्सच्या वेळी मुलींच्या शरीरातून रक्त जातं.


  हा अॅनिमिया म्हटलं तर अगदी साधा आणि म्हटलं तर धोकादायक. याची वेगळी अशी खास लक्षणं नसतात. पण थकवा जाणवतो, कामातला उत्साह कमी होतो. एकाग्रता कमी होते, वर्गात लक्ष लागत नाही. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सारखी आजारपणं येतात. रक्ताचं प्रमाण फारच कमी झालं तर दम लागायला लागतो. मुलींच्या बाबतीत आणखी एक धोका असतो. काही काळानं जेव्हा त्या प्रेग्नंट होतात तेव्हा होणा-या बाळाच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. ते लहानखुरं जन्माला येतं. कारण त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. म्हणजे फक्त त्या मुलीवरच नव्हे तर चक्क पुढच्या जनरेशनवर परिणाम होतो. तरुणपणातला अॅनिमिया धोकादायक असतो असं मी म्हटलं ते यासाठीच.


अॅनिमिया झाल्यावर लोहाच्या आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायला लागतात. जास्त गंभीर असेल तर रक्त चढवायला लागतं. पण तो मुळात होऊ नये म्हणून आपली लाइफस्टाइल थोडी बदलायला हवी. वेळेवर जेवण, आहारात भरपूर भाज्या, मोडाची कडधान्यं आणि फळांचा समावेश; आणि लोखंडाच्या भांड्यांचा स्वयंपाकात वापर हे काही अगदी साधे उपाय. नॉनव्हेज अन्नातून भरपूर लोह मिळतं. व्हेज खाणा-यांनी हिरव्या पालेभाज्या, कडधान्यं, ड्रायफ्रुट्स, गूळ, खजूर खायला हवं. 
सौम्याच्या अॅनिमियाचं कारण निघालं तिचा अपुरा आणि अयोग्य आहार. तिला रोज उठायला उशीर व्हायचा म्हणून ती ब्रेकफास्ट न घेता निघायची. दुपारी असंच काहीतरी कॅंटीनमध्ये खायचं. संध्याकाळच्या जेवणात तिची रोजची फर्माईश असायची, पोळीभाजी नको, काहीतरी वेगळं हवं म्हणून.


 पण आता तिनं ठरवलंय, पुन्हा या सगळ्या त्रासातून, तपासण्यांच्या चक्रातून जायचं नाही. लोहाच्या गोळ्या घेण्याबरोबर तिनं मुकाट्यानं आपलं डाएटही सुधारलंय. रोज नाश्ता घेतल्याशिवाय ती घराबाहेर पडत नाही. बरोबर डबा घेऊन जाते आणि तिच्या सॅकमध्ये नेहमी एक फळ असतं. आता तीन महिन्यांनी हिमिग्लोबीन तपासलं की कळेल वाढलंय का ते.


बाबांची भूमिका

व्हिवा जुलै ४


बीए च्या दुस-या वर्षाला असलेला चेतन आणि त्याची आई, दोघेही काहीसे टेन्स होते. चेतनच्या आणि त्याच्या बाबांच्या रोजच्या वादविवादांना आई कंटाळली होती. वाद तिचेही व्हायचे चेतनशी, नाही असं नाही. पण आजकाल का कोण जाणे, बाबांना त्याचं काही म्हणता काही पटत नव्हतं. साधं काही तरी बोलायला सुरुवात झाली तरी त्याचं पर्यवसान भांडणात व्हायचं. आईची मध्यस्थी करताना पुरेवाट व्हायची. मग जितकं शक्य होईल तितका चेतन बाबांना टाळायचा प्रयत्न करायचा. काही निरोप सांगायचा झाला तर तो आईतर्फे सांगायचा, जेवणाचं ताट रुममध्ये घेऊन जायचं असं काहीतरी करायचा. बाबांचा राग मग आणखीनच वाढायचा.


बारावीला तसे चांगले मार्क्स पडले होते त्याला. पण त्यानं ठरवलं होतं स्पर्धा परीक्षा द्यायच्या.  म्हणून बीए ला अॅडमिशन घेतली. बाबांना हे काही फारसं पटलं नव्हतं. त्यावरून नेहमी वाद व्हायचे. शिवाय त्याची अस्ताव्यस्त रूम, जुने, फाटके कपडे घालणं, उशिरा उठणं, वाट्टेल तेव्हा खाणं हे सगळंच असह्य व्हायचं त्यांना. किती नाही म्हटलं तरी ‘आम्ही तुझ्या वयाचे असताना....’ असा डायलॉगही यायचा अधूनमधून तोंडात. ‘अरे काहीतरी शिस्त लाव स्वत:ला, जरा घराकडे लक्ष दे, आईला मदत कर’ ते चेतनला सांगायचा प्रयत्न करायचे.  


चेतनला आठवलं, ‘लहानपणी आपण किती मज्जा करायचो. बाबा रात्री कितीही दमून आले तरी त्यांच्या बरोबर कुस्ती ही ठरलेली. तेही कौतुकानं सहन करायचे सगळं. पसारा करणं हे तर आमचं सिक्रेट असायचं, आईपासून लपवलेलं. रविवारी टेकडी चढताना रेस लावायची तर बाबांबरोबरच. आणि आईच्या विरोधाला न जुमानता अधून मधून हॉटेलमध्ये जाऊन कित्ती चिकन हादडायचो. आई तेव्हा नेहमी म्हणायचीसुद्धा, ‘अगदी एकाला झाकावं आणि एकाला काढावं इतके सारखे आहात तुम्ही दोघे.’ अजूनही बाबांच्या आणि आपल्या सवयी किती सारख्या आहेत. पुस्तकांपासून ते मुव्हीज पर्यंत. पण झालंय काय आजकाल? धड एकही शब्द एकमेकांशी सरळ बोलता येत नाही आपल्याला!’ खूप गोंधळला चेतन. म्हणून माझ्याकडे आले दोघं.


खरंतर मुलगा जन्माला येतो तेव्हा अगदी आनंदोत्सव साजरा केलं जातो. वंशाचा दिवा, कुलदीपक, घराण्याचं नाव चालवणारा राजकुमार अशी अनेक विशेषणं त्याला लावली जातात. मग नव्याची नवलाई संपते. बाबा कामाला जायला लागतात. मुलगा हळूहळू मोठा होतो. संध्याकाळी कामावरून दमून आल्यावर मुलाबरोबर बोलणं काय होतं तर ‘अभ्यास केलास का? आणि आईला त्रास दिला नाहीस ना?’ हसणं, खेळणं विसरून जायला होतं. मुलगा वयात यायला लागतो, उद्धट, उर्मट उत्तरं द्यायला लागतो. स्वतंत्र होण्याची स्वप्नं बघायला लागतो. निसर्गाला हवं असतं हे स्वातंत्र्य. त्याशिवाय शिकणार कसे तुम्ही या जगात एकटे रहायला? हे बदललेलं समीकरण पटायला जड असतं आईबाबांना. गप्पा बिप्पा राहतात बाजूला, फक्त वाद सुरु होतात. शिवाय स्वत:च्या मनातलं प्रेम शब्दांत सांगायची सवय कुठे असते बाबांना? सतत कमावत्या माणसाच्या, बॉसच्या भूमिकेत रहाणं त्यांच्यासाठीही काही फार आनंदाचं नसतं. हवेहवेसे वाटणारे बाबा टाळावेसे केव्हापासून वाटायला लागले? नक्की कधी बदलायला लागलं हे नातं? लक्षातही येत नाही.


बाप-मुलाच्या नात्यावर खूप अभ्यास झालाय. इडीपस कॉम्प्लेक्स, सत्तेसाठी, पॉवरसाठी स्ट्रगल अशी कारणंही यासाठी दिली गेलीयेत. संवादाचा अभाव हे एक मोठं कारण असावं असं वाटतंय. शिवाय आपली पारंपारिक पद्धत अशी कि पुरुषांनी बाहेर जाऊन काम करायचं आणि बायकांनी घरी राहून मुलांकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे वडीलांचं काम काहीसं रिंगमास्तरसारखं झालंय.


आजची जनरेशन या गोष्टी काही प्रमाणात दुरुस्त करायचा प्रयत्न नक्कीच करतेय. आजचे बाबा त्यांच्या कठोर मुखवटयातून बाहेर येतायत. मुलांना फक्त धाकात ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी खेळलं तर जास्त मजा येते हे ते अनुभवतायत. वयात येताना, मोठे होताना मुलांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करतायत. काहीवेळा अलगद आईच्या भूमिकेतही शिरतायत. मनातून मुलांवर कितीही प्रेम करत असलो तरी ते शब्दांतून, कृतीतून त्यांच्यापर्यंत पोचवायला लागतं हे त्यांच्या लक्षात यायला लागलंय.


चेतनला त्यांची ही बाजू समजून घ्यायला लागेल. हळूहळू त्यांच्याशी संवाद साधायला लागेल. आपल्या वागण्याचा रिव्ह्यू घ्यायला लागेल. आणि हो, आपण बाबा झाल्यावर कसं वागायचं यावरही विचार होईलच त्याचा यातून.
   
           


  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...