Friday, 19 January 2018

हॅपी जर्नी

व्हिवा जुलै ३१


 शिखाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा गेल्या आठवड्यात अॅक्सिडेंट झाला. रात्री उशिरा एक काम संपवून ती परत येत होती. रेड सिग्नल लागला म्हणून ती थांबली तर मागून जोरात येणा-या गाडीनं तिला धडक मारली. डॉक्टर म्हणाले की तिनं हेल्मेट घातलं होतं म्हणून ती वाचली. पण पाय फ्रॅक्चर झाला. तातडीनं ऑपरेशन करायला लागलं.

पेपरमध्ये आलेल्या दुस-या एका बातमीतली मुलं मात्र तितकी नशीबवान नव्हती. पार्टी मूड मध्ये असलेल्या त्या दोन मुलांची तुफान वेगात असलेली कार वाटेतल्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की दोघेही वाचू शकले नाहीत.

रोज पेपर उघडला की अॅक्सिडेंटची एकतरी बातमी वाचायला लागते. बहुतेक अॅक्सिडेंटस पहाटेच्या वेळी होतात. आणि तुमच्यासारखे तरुण त्यात बळी जातात. बातमी वाचून आपण हळहळतो, चुकचुकतो आणि विसरून जातो. कित्येक डीटेल्स आपल्याला कधीच समजत नाहीत. नक्की काय झालं? टाळता आला असता का तो अपघात? हेल्मेट घातलं होतं का? स्पीड लिमिट पाळलं होतं का? गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होते का? दारू प्यायली होती का? कुणाशी विनाकारण स्पर्धा चालू होती का? रात्रीचा प्रवास टाळून नीट झोप काढून सकाळी निघता आलं असतं का? का होतात अपघात रात्रीच्या वेळी जास्त? उलट तेव्हा रस्त्यावर गर्दी कितीतरी कमी असते.


 कोणत्याही सिग्नल वरचं दृश्य घ्या. अनेक शूरवीर लाल सिग्नलला थांबण्याचे कष्ट न घेता झपकन जात असतात. पिवळ्या सिग्नलमधून वेगात गाडी काढत असतात. चुकूनमाकून थांबलेच असतील तर त्यांचा हॉर्नवरचा हात काही निघत नाही. तिथे थांबलेले सगळे येडे आहेत अशा नजरेनं ते लोकांकडे तिरस्कारानं पाहत असतात. आणि तो सिग्नल हिरवा झाल्या झाल्या हॉर्न वाजवून सुटायची किती घाई!
सिग्नलला थांबण्याचे इतके कष्ट का वाटतात आपल्याला ? एरवी तासनतास वेळ वाया घालवणारे आपण काही सेकंदांसाठी एवढे अस्वस्थ का होतो? आमच्या युथ क्लब मध्ये जेव्हा याविषयी चर्चा झाली तेव्हा सुरुवातीला सगळ्यांची उत्तरं ‘पोलीटीकली करेक्ट’ या प्रकारात मोडणारी होती. आपण कसे नेहमी सिग्नल पाळतो हे प्रत्येकजण हिरीरीनं सांगायला लागला. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, ‘ए, पण रस्त्यावर कुणी नसेल तर कशाला थांबायचं उगीच? नीट इकडे तिकडे बघून गेलं कि झालं.’ कुणीतरी असं म्हणायची वाटच बघत होते सगळे. लगेच बहुतेकांना ते पटलं. ‘बरोबर आहे, रात्रीच्या वेळी कारण नसताना चालू ठेवतात सिग्नल, तेव्हा कुणीच नसतं रस्त्यावर, उगीच वेळ वाया जातो’
एकूणच रहदारीचे नियम आपल्याला त्रास देण्यासाठी बनवलेले असतात असं बहुतेक तरुणांचं ठाम मत असतं. मग ते हेल्मेट घालणं असो, कागदपत्र बाळगणं असो की स्टॉप लाईनच्या मागे थांबणं असो. वन वेज आणि नो एन्ट्रीज तर फारच अडचणीच्या. आणि नेमका आपल्याला उशीर झाला कि सगळे सिग्नल लाल लागणार हे ठरलेलं.


न्यू इअर च्या रात्री नाक्या नाक्यावर पोलीस उभे असतात ते का? कारण कुठलीही पार्टी म्हणजे अल्कोहोल पिणं हा नॉर्म झालाय. काहीवेळा इतर ड्रग्जही घेतले जातात. अमलाखाली आपला ब्रेन कसा काम करेल? वर मूडही मस्तीचा असतो. एकमेकांशी गप्पा मारत, रेस लावत कशाही गाड्या चालवल्या जातात. शक्य तितके ट्रॅफिक रुल्स इग्नोअर केले जातात. साहजिकच अॅक्सिडेंट्स जास्त होतात.
 घाई तर नेहमीच असते आपल्याला! पण दर वेळी असं स्वत: अनुभव घेऊन पहायचं का? एखादी वेळ अशी येते की या घाईची जबर किंमत चुकवायला लागते.
मोडलेली गाडी दुरुस्त करता येते. अगदीच नाही तर नवीन घेता येते. पण मोडलेलं शरीर दुरुस्त करणं नेहमीच शक्य होतं असं नाही. त्यात वेळ, पैशाचा चुराडा तर होतोच शिवाय मानसिक आणि भावनिक त्रास होतो तो वेगळाच. आणि जीव गेला तर? तो दुसरा कुठून आणायचा?



शिखाच्या कॉलेजमध्ये या प्रसंगानंतर ट्रॅफिक पोलिसांनी एक वर्कशॉप घेतलं. अपघात झालेली ती मैत्रीण मुद्दाम व्हील चेअरवर आली होती. जे सगळे रुल्स अननेसेसरी वाटतात ते मोडले तर काय काय होऊ शकतं यावर काही रोल प्लेज झाले. चौकात बसवलेले सिग्नल्स किती विचार करून बसवलेले असतात, त्यासाठी किती काळजीपूर्वक प्लानिंग केलेलं असतं ते पोलिसांनी सांगितलं. रस्ता रिकामा आहे म्हणून गाडी सुसाट सोडण्याचे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात हे काही फिल्म क्लिप्स मधून दाखवलं. रात्रीच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी तेही सांगितलं. शेवटी अगदी शाळेत घेतात तशी सगळ्यांनी ट्रॅफिक रुल्स पाळण्याची शपथ घेतली. शिखा, तिची मैत्रीण आणि इतर ब-याच मुलांनी ट्रॅफिक अवेअरनेसचा हा वसा पुढे न्यायचा ठरवलाय. 

       

No comments:

Post a Comment

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...