Wednesday, 1 November 2017

न संपणारी गोष्ट


        शौनक पटकन जेवून तयार झाला. रात्री दहा म्हणजे त्याची रोजची यू एसच्या कॉल ची वेळ. ‘अरे एक दिवस तरी वेळेवर झोप! काही दिवसरात्रीचं भान आहे की नाही?’ आईला अजिबात आवडायची नाही ही कामाची विचित्र वेळ. ‘अगं आई,  अमेरिकेत आत्ता कुठे दिवस चालू झालाय. आपण झोपलो म्हणून जग चालायचं थांबत नाही. तुला नाही कळायचं ते.’ पण मग हा तर दिवसभरही ऑफिस मध्ये असतो, तेव्हा काय करतो? याचा दिवस संपतच नाही की काय?

   शौनकच्या दिनक्रमावरून मला एक कथा आठवली. एका राजाला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. एकदा त्यानं फर्मान काढलं, मला न संपणारी गोष्ट ऐकायचीय. अनेकांनी प्रयत्न केले, पण कधी ना कधी त्यांची गोष्ट संपायची. एका मुलाची गोष्ट तर चांगली तीन महिने चालली, पण शेवटी संपलीच. मग एक साधू आला आणि त्यानं ती सुप्रसिद्ध न संपणारी गोष्ट राजाला सांगितली. तो म्हणाला, ‘एके वर्षी खूप पाऊस झाला, भरपूर धान्य उगवलं. एका शेतकऱ्याने शंभर धान्याची कोठारं भरून ठेवली. काही चिमण्यांनी हे पाहिलं. त्यांनी खूप प्रयत्न करून त्यातल्या एका कोठाराला भोक पाडलं. मग एक चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली, दुसरी चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली....’ साधूची गोष्ट अशीच चालू राहिली. राजाला कळून चुकलं, ही गोष्ट जरी न संपणारी असली तरी निरर्थक आहे. म्हणजे न संपणा-या गोष्टी नेहमी चांगल्याच असतात असं नाही. त्यानं साधुबाबांसमोर हार पत्करली.

    ‘टेड टॉक’ नावाचा एक व्याख्यानांचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी जो टेड टॉक ऐकला, त्याचा फार इंटरेस्टींग विषय होता, ‘स्टॉपिंग क्यूज’, म्हणजे थांबण्याचे इशारे. ट्वेंटीएथ सेन्चुरीमध्ये प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपायची. तेव्हा सूर्याबरोबर सुरु होणारा दिवस सूर्याबरोबर संपायचा. टीव्हीवरचे कार्यक्रम घड्याळात एक वेळ झाली की संपायचे, आणि तो बंद व्हायचा. अकरा वाजता रेडीओवरचं ‘बेला के फूल’ संपलं की तो बंद करायलाच लागायचा. थोडक्यात, प्रत्येक गोष्टीची आपली एक वेळ असायची आणि आपला एक लाईफ स्पॅन असायचा. आता मात्र त्या न संपणा-या गोष्टीसारखी आपली दिवाळी, सेलिब्रेशन, काम, एन्टरटेनमेंट, हाव, गरजा, टेक्नॉलॉजी,... काही संपतच नाही.  संपत नाही म्हणण्यापेक्षा ते कधी आणि कसं थांबवायचं ते आपल्याला कळत नाही. चोवीस तास रेडीओ चालू असतो, टीव्हीवर ट्वेंटी फोर अवर्स न्यूज चॅनल्स असतात. कुठे सुट्टीला गेलो तरी लोक लॅपटॉपवर काम करत असतात, मोबाईल वर मोठमोठी डील्स करत असतात.

       न संपणारी ही गोष्ट फक्त टेक्नॉलॉजीच्याच बाबतीत होतेय असं नाही. तुमच्यातले किती जण पुस्तक वाचतात? त्यात वेगेवगळे चॅप्टर्स असतात, हो ना? एक चॅप्टर संपला की पुढचा चॅप्टर वाचायचा की नाही हे ठरवायला उसंत मिळते. आणि कधी ना कधी पुस्तक वाचून संपतं. तेच पेपर वाचतानाही होतं. वाचून झालं की घडी करून आपण पेपर बाजूला ठेवून देतो. तीच गोष्ट दिवाळीची. आधी चिवडा, चकलीचा खमंग वास यायला लागला की दिवाळी आली हे आपोआप समजायचं. पण आता? आपली दिवाळी तर कायम चालूच असते. खास दिवाळीशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या, फराळ, सुगंधी साबण, नवीन कपडे, त्या आता कायम असतातच आपल्या घरात, नाही का? म्हणजे एखादी गोष्ट ‘आता संपली’ हे लक्षात येण्याचा कोणता मार्गच आपल्यासमोर नसतो आजकाल.

  त्याच टॉक मध्ये यातले काही उपाय सांगितलेले ऐकले. डाईमलर नावाची जर्मन कार कंपनी आहे. तिथे असा नियम आहे की एखादा कुणी जर सुट्टीवर असेल तर त्याला आलेल्या ई मेल्स डिलीट केल्या जातात. म्हणजे तो जेव्हा परत येईल तेव्हा ढीगभर काम त्याच्यासाठी वाट बघत नसतं. तो खरोखरच कामापासून पूर्णपणे डिसकनेक्टेड असतो. स्टीव्ह जॉब्जनं आय पॅड बनवलं, पण त्याच्या घरी ते नव्हतं. त्यानं जाणीवपूर्वक मुलांना त्यापासून दूर ठेवलं होतं.

      वजन जास्त वाढलं किंवा फार खाल्लं तर आपण डी-टॉक्स डाएट करतो ना, तसं मधून मधून टेक्नॉलॉजीचं डी-टॉक्स करायला हवं, तिलाही नाही म्हणायला शिकायला हवं. नाहीतर आपला स्नो बॉल होईल. उतारावरून गडगडत जाताना वाटतं तसं हेल्पलेस वाटायला लागेल. पण ते ‘जुनाट’ स्टॉपिंग क्यूज कुठे आहेत आता? त्यामुळे हा सिग्नल किंवा इशारा तयार करण्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असणार असं दिसतंय. म्हणजे काहीतरी तरकीब शोधायला हवी यावर. मग ते स्वत:नं स्वत:ला घातलेले नियम असतील, एखादी खूण असेल, अलार्म असेल किंवा चक्क मोबाईल कडीकुलुपात ठेवणं असेल.
तुमचा काय आहे स्टॉपिंग क्यू?






No comments:

Post a Comment

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...