Monday, 17 July 2017

लग्न - To Do or Not to Do!




Image result for question mark      एका पार्टीत दोन बायका गप्पा मारत असतात. एक दुसरीला विचारते, ‘तुझा नवरा तुला सुखात ठेवतो का ग?’ जवळच असलेल्या नवरोबांचे कान तिकडेच असतात. उत्तर काय असणार याची खात्री असते त्याला. पण बायको म्हणते, ‘नाही.’ तिचं हे धक्कादायक उत्तर ऐकून तो चक्रावतो. सगळीकडे सन्नाटा पसरतो. ती पुढे म्हणते, ‘नो, ही डझन्ट मेक मी हॅपी, आय अॅम हॅपी. त्यानं मला सुखी करायची गरज नाही. ती  जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी माझी मीच सुखी आहे.’ 
कुठेतरी वाचलेली ही गोष्ट. यशस्वी लग्नाचं सिक्रेट सांगणारी. नक्की कुणासाठी आणि कशासाठी करतो आपण लग्न? हे असं कुणीतरी आपल्याला सुखात ठेवावं म्हणून? कि एक रिवाज म्हणून? की समाजात मानानं जगता येण्यासाठी? कंटाळा आला म्हणून कि वेळ जात नाही म्हणून? खरंतर लग्न करावं कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ही गोष्ट इतकी समाजमान्य झाली आहे कि तो प्रश्न अगदी सार्वजनिक बनून जातो. शिक्षण संपलं, नोकरी लागली, मग आता पुढे काय? तर लग्न!

 शामिकाच्या घरात सध्या याच कारणावरून वाद चालू आहे. ती दोन वर्षांपूर्वी आर्किटेक्ट झाली. तिचं काम बघून तिला एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही मिळाली. आपल्या कामावर ती जाम खूश आहे. नवनवीन प्रोजेक्ट्स, चॅलेन्जेस, अचिव्हमेंट्स यात ती अगदी बुडून गेलीये. उरलेल्या वेळात मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाणं, मोबाइलवर चॅटिंग यात ती बिझी असते. घरच्यांच्या वाट्याला ती फार कमी वेळ येते. आजकाल तर ती मुद्दामहूनच टाळते आपल्याला असं वाटायला लागलंय आईबाबांना.
  नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी आईबाबांना विचायायला सुरुवात केली यंदा कर्तव्य आहे का म्हणून. घरात आजीही असते. तिला कळतच नाहीये आता शामिका लग्न का करत नाहीये ते. ‘झालं ना गं शिकून? मग आता काय? प्रत्येक गोष्टीची वेळ असते!’ मधेच कुणाच्या तरी लग्नाची पत्रिका येते. नाहीतर शामिकाच्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न ठरल्याची बातमी येते. अशा वेळी ही चर्चा आणखीनच तीव्र होते.   
 ‘मावशी, तू एक दिवस येऊन बघ आमच्या घरी, तुलाही बोअर होईल. तुला माहितेय का, जेव्हा बघावं तेव्हा आमच्या घरी लग्नाचा विषय चालू असतो. जणूकाही जगात दुसरे कोणते विषयच नाहीत. खरंतर माझ्या डोक्यातही नाहीये असलं काही आत्ता. काय घाई आहे? बघू ना नंतर कधीतरी! तसं बघायला गेलं तर प्राणी कुठे करतात लग्न? आदिमानव काय लग्न करायचा? आणि लग्न झालं म्हणून लोक सुखी होतात का?’ शामिकाकडे बिनतोड मुद्दे तयार आहेत वादासाठी.
आईबाबांनी शेवटी वैतागून विचारलं, ‘मग, काय म्हणणं आहे तुझं? लिव्हिंग-इन वगैरेचा विचार करतेयस का? पण मुलं होणार असतील तर त्यासाठी तरी लग्न आवश्यक आहे हे पटतंय का तुला? त्या बिचा-या मुलांना का तुमच्या विचारांची शिक्षा?
‘नॉट रियली. ही अशी कुणाला कमीटमेंट देणंच अवघड वाटतंय मला. कॅज्युअल डेटींग वगैरे ठीक आहे, पण इतकं माझं आयुष्य मला नाही शेअर करायचंय कुणाबरोबर आत्तातरी. शिवाय लग्न केलं कि झालं असं कुठे असतं? लगेच लोक मुलाबिलांची चौकशी करायला सुरुवात करतात. आत्ता तुम्ही सुद्धा तेच केलंत. आपण लग्नाविषयी बोलत होतो तर तुम्ही मुलांवरच घसरलात. माझ्या काही मैत्रिणींचं बघतेय ना मी. त्या अशाच घरच्यांच्या आग्रहाला बळी पडल्या. लग्न झाल्यावरही करता येतं करियर असं त्या मला सांगायच्या. पण आता म्हणजे ‘विसरा आता करीयर वगैरे’ अशी स्थिती झालीये त्यांची.’  

लग्नाच्या विषयाकडे आजचे तरुण वेगळ्या नजरेनं बघतायत. ‘काय गरज आहे लग्नाची? सगळ्यांनी लग्न करायलाच हवं का? लग्न करणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? आणि स्वत:च्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणून जर लग्न करायचं असेल तर त्यासाठी नवरा कशाला हवा? मी भरपूर कमावते, मला हवं ते करायला कुणाची बंदी? हं, कदाचित म्हातारपणी मला एकटं वाटेल. पण तेव्हाचं तेव्हा पाहू. मनात येईल ते करण्याचं स्वातंत्र्य गमावून कुणाचं तरी घर सांभाळण्याचं काम करण्यात काय अर्थ आहे? आजकाल तर लग्न करण्यापूर्वीच प्री-नप्शिअल अग्रीमेंट करतात. उगाच पटलं बिटलं नाही तर नन्तर काही भानगड नको.’

शामिकाला जी भीती वाटतेय त्यात कितपत तथ्य आहे? आणि ही भीती फक्त करीयरविषयीच आहे का? यातला कुठलाही नियम जनरलाइज करता येतो का? कमीटमेंट, स्वातंत्र्य, मुलं, जास्तीच्या जबाबदाऱ्या, अशा अनेक गोष्टींचं तिला टेन्शन आहे, ते का? पूर्वी नव्हत्या का या गोष्टी? आजच्या जमान्याच्या टोकाच्या स्वकेंद्रित जगण्याचं हे प्रतिबिंब आहे का? कि लग्न ही संस्थाच आता आउटडेटेड व्हायला लागलीय? मग कुटुंबसंस्थेचं भविष्य काय? आणि कुटुंबाच्या युनिट वर अवलंबून असलेल्या सोसायटीचं काय? या बदलत्या विचारप्रवाहात ती टिकून राहणार का?

तुम्हांला काय वाटतं? 

(Published in Viva Loksatta June 2017)

No comments:

Post a Comment

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...