Wednesday, 18 October 2017

A book review by Dr Vijaykumar Mane

टीन एज डाॕट काॕम #१..डाॕ.वैशाली देशमुख     पौगंडावस्थेतील मुलांमध्ये नैसर्गिक बदल घडत असतात.त्यामुळे ती स्वतः तर गोंधळून जातात अन् पालकांनाही गोंधळात टाकतात. मग या सर्वाना कोणीतरी हे बदल व्यवस्थित समजावून सांगायला हवेत ना..काळजी करु नका.आपल्याशी अगदी किशोर मित्र -मैत्रिणीप्रमाणे दिलखुलास  गप्पा  मारण्यासाठी आल्या आहेत पौगंडावस्थेतील मुलांच्या विशेषतज्ञ डाॕ.वैशाली देशमुख  टीनएज डाॕट काॕम#१ या पुस्तकाद्वारे.त्यानी संवादातून हा नाजुक व अवघड विषय उलगडून दाखवला आहे.लेखिकेची ही हातोटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.पौगंडावस्थेतील प्रत्येक घटकाचा त्यानी सुक्ष्मपणे विचार करुन विस्तृत स्वरूपात वाचकांसमोर मांडला आहे.विषय सोपा करण्यासाठी अधूनमधून उदाहरणे दिली आहेत.आलोक यांच्या समर्पक व्यंगचित्रांमुळे पुस्तक  मनोरंजकही बनले आहे.लेखिकेने पौगंडावस्थेतील सर्व बाबींचा अर्थात शारीरिक व मानसिक बदल,आहार,व्यायाम इ.चा आढावा घेतला आहे.युवावर्गाचे आवडते विषय प्रेम व दोस्ती यालाही स्पर्श केला आहे.व्यसनांबद्दलही बरीच माहिती लेखिकेने दिली आहे.सर्वसाधारणपणे मुलांच्या मनात येणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले आहे.पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांची गुरुकिल्ली म्हणजे जीवनकौशल्ये..त्याचा उल्लेख लेखिकेने केला आहे.त्याचा खोलवर परामर्श घेणे कदाचित जागेअभावी शक्य झाले नसावे.तीच गोष्ट पालकांच्या भूमिका विषद करताना झाली असावी.किंवा पुढच्या भागात तो  मांडण्याचा लेखिकेचा मानस असावा.खरंतर एवढा मोठा विषय हाताळताना वाचकांच्या मर्यादेचा  (अन् तोही किशोरवयातील) विचार लेखिकेने केला आहे.  शास्त्रीय माहिती देताना रेखाचित्रांचा वापर संयुक्तिक ठरला असता.प्रत्येक लेखातील ठळक गोष्टीं वेगळ्या अक्षरांद्वारे दाखवण्याची कल्पना छानच! .फक्त त्या  गडद अक्षरात वा चौकटीत दाखवल्या असत्या तर आणखी उठावदार झाल्या असत्या. कठीण विषयाची माहिती सोप्या पध्दतीने सादर करुन  एक माहितीप्रधान वाचनीय  व अभ्यासनीय पुस्तक वाचकांच्या हाती सोपवल्याबद्दल लेखिका डाॕ .वैशाली देशमुख यांचे  तसेच  राजहंस प्रकाशनचे खूप खूप अभिनंदन तसेच डाॕ .वैशाली देशमुख यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी  आभाळभरुन शुभेच्छा !...डाॕ .विजयकुमार स.माने

No comments:

Post a Comment

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...