स्थळ- रेल्वेस्टेशन, रेल्वे
पात्रे- तिकीट चेकर, किशोरवयीन मुले-मुली, सहप्रवासी
( सुहास आणि त्याची दोस्तमंडळी सुट्टीमध्ये एका छोट्या
ट्रीपला चालली आहेत.)
सुहास- ( रेल्वेस्टेशनमधल्या गर्दीतून वाट काढत ) अरे,
पटापट चला जरा. अजून आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे तेपण शोधायचंय.
विशू- हो ना, तरी मी सांगत होतो अर्धा तास आधी पोचायला हवं
म्हणून. ही अस्मी नेहमी उशीर करते.
अस्मी- बरं बाबा, तुझंच बरोबर! आता चालणार आहेस की असाच कीस पाडत बसणार आहेस?
हमाल- ओ ताई, द्या हिकडं ती ब्याग. कुटली गाडी हाय? म्या देतो बसवून.
सुहास- नको दादा, आम्ही जाऊ. थँक यू.
(एकदाचे प्लॅटफॉर्मवर पोचून डब्यात शिरतात.)
जितू- अरे काय हे सुहास, एक जागा इकडे आणि बाकी सगळ्या
तिकडे? तू नीट बघितलं नाहीस का बुकिंग करताना?
अनू- असू दे रे. सगळे आले ना, की करू आपण अॅड्जस्ट.
विशू- (किंचाळून) ईsss इथे झुरळ आहे! मी नाही बसणार इथे.
( सगळे हसतात)
काका (सहप्रवासी)- घाबरू नकोस बाळ, ये, तू इकडे बस.
( विशू एकटाच इतरांपासून वेगळा बसतो. थोड्या वेळाने... )
विशू- आsss वाचवा, वाचवा!
अनू- काय चाललंय काय आज विशू तुझं? किंचाळतोयस का सारखा?
विशू- अगं, हे काका बेशुद्ध पडलेत बहुतेक.
अनु- काहीतरी काय? ते गाढ झोपलेयत आणि घोरतायत. (त्यांना
हलवून) हे बघ, जागे झाले. सॉरी काका. काही नाही, झोपा तुम्ही. चल विशू, तू इकडे ये बघू. आम्ही पत्ते खेळतोय.
(सगळेजण पत्ते खेळण्यात गुंग होतात. बरोबर आणलेल्या खाऊची
देवाण-घेवाण होते. बराच वेळ जातो, काही स्टेशन्स येऊन जातात. तिकीट चेकर येतो)
सुहास- हं, ही आमची तिकीटं.
तिकीट चेकर- तुमचं स्टेशन गेलं की मागे. उतरला नाहीत का
तुम्ही? चला, आता येणा-या स्टेशन वर उतरून घ्या.
जितू- क- क्काय? उतरून घ्या म्हणजे? सांगितलं का नाही कुणी
आम्हांला? इथे उतरून काय करू आम्ही? ए, आपण चेन खेचायची का?
सुहास- जितू एक मिनिट. काका, ही गाडी परत येते का या
मार्गानं? जायचं कसं मागच्या गावात आम्ही?
तिकीट चेकर- हे बघा, मला ते काही माहिती नाही. हे आलं
स्टेशन. पटकन उतरून घ्या. नाहीतर दंड भरायला लागेल विना तिकीट प्रवास केला म्हणून.
(सगळेजण त्या सुनसान स्टेशनवर गोंधळून उभे)
अस्मी- बाप रे, काय करायचं आता? मला फार भीती वाटतेय. कसली
भयानक जागा आहे ही! बसा आता इथेच डोक्याला हात लावून. मी काही कुठल्या अनोळखी
लोकांशी बोलणार नाही बुवा. शी:, सगळी ट्रीप वाया गेली.
मीता- ए अस्मी, अगं उलट खूप मज्जा येईल. मला तर आपण त्या
फेमस फाईव्ह सारखं काहीतरी धाडस करतोय असं वाटायला लागलंय.
चिनू- जे काही असेल ते असेल, पण आपल्याला काहीतरी करायला
हवं आता. कुणालातरी विचारायचं का? पण इथे तर काळं कुत्रं पण दिसत नाहीये. काय
स्टेशन मास्तर वगैरे नाहीयेत का इथं? ए अरे सुहास, बघ ना काहीतरी.
विशू- हो रे सुहास. एकतर ही सगळी आयडिया तुझी होती. आणि
तुम्हांला माहितेय का, आपल्याला फोनही करता येणार नाहीये कुणाला. सुहास साहेबांनी
फोन न आणण्याचं फर्मान काढलं होतं ना, त्यामुळे आपण कुणीच आणले नाहीयेत.
सुहास- सॉरी विशू, अरे मला वाटलं आपली ट्रीप गॅजेट-फ्री
असावी. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे, आपण एका रेल्वे स्टेशन वर आहोत, कुठेतरी
वाळवंटात नाही. सापडेल काहीतरी मार्ग.
अनु- सुहास, थँक्स. कुणीतरी जरा बरा विचार करतोय हे बघून
मला बरं वाटलं. चला, त्या स्टेशन मास्टरना शोधूया आणि परतीच्या ट्रेनची चौकशी
करूया. इथे थांबून काय करणार? किंवा आपल्याला एखादी एस टी बस वगैरे मिळू शकेल. नाहीतर
लिफ्ट मागू कुणाकडे तरी.
चिनू- लिफ्ट? तसलं काहीतरी करायचं असेल तर जरा नीट बघून घ्यायला
हवी हं. माझा मावसभाऊ असाच एकदा कुणाच्यातरी गाडीत बसला तर त्या लोकांनी त्याला
सरळ लुटलं!
जितू- हं, आणि परत जायला हरकत नाही पण मग आपली पिकनिक राहून
जाईल. त्यापेक्षा असं करायचं का? इथेच करू पिकनिक. आपल्याकडे भरपूर खाऊ आहे.
मस्तपैकी शेतात हिंडू आणि मजा करू.
मीता- हेच म्हणायचं होतं मला. ती बघ, तिकडे एक आमराई
दिसतेय. मस्त गार सावली आहे. त्या मालकांना शोधूया. त्यांची परवानगी पण घेता येईल
आणि ते आपल्याला काही मदतही करतील.
सुहास- अरे वा, भरपूर आयडियाज जमा झाल्या की! मजा येईल
आमराईत पिकनिक करायला. फक्त त्याआधी परतीच्या ट्रेनची चौकशी करून ठेवू. अंधार
पडायच्या आत घरी पोचायला हवं ना! स्टेशन मास्टर आलेले दिसतायत, मी बोलून येतो
त्यांच्याशी. तोपर्यंत तुम्ही जरा बघाल का आपल्यापाशी पैसे किती आहेत ते?
(सुहास स्टेशन मास्टर शी बोलून परत येतो)
गुड न्यूज! चार वाजता एक ट्रेन आहे. म्हणजे आपल्याला
मनसोक्त हिंडून साडेतीन पर्यंत परत आलं तरी चालेल. नशिबानं त्यांच्याकडे फोन होता
आणि त्यांनी मला तो वापरू दिला. मी बाबांना कल्पना दिलीय आपण इथे आहोत म्हणून. ते
कळवतील तुमच्या आई-बाबांना. चला तर मग आमराईकडे! लेफ्ट-राईट-लेफ्ट!
(साडेतीनला सगळे स्टेशनवर परत आलेत. हसणं-खिदळणं, मस्ती
चालू आहे.)
चिनू- आsssहाहा, इथेच ताणून द्यावीशी वाटतेय मला. काय मस्त
आंबे होते! ते काका किती चांगले होते ना! त्यांनी आपल्याला चक्क वाट्टेल तितके
आंबे खा म्हणून सांगितलं.
मीता- हो ना, कोणी इतकं उदार कसं असू शकतं? बाप रे, कित्ती
हसलो आपण! आणि केव्हढी गाणी म्हटली! माझा तर घसाच दुखायला लागलाय. पण मजा आली खूप.
तुमच्या लक्षात आलं का, मोबाईल फोन्स नसल्यामुळे आपण एकही फोटो काढला नाही की गाणी
लावली नाहीत. मला चक्क पक्षांची किलबिल आणि कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येत होतं.
अस्मी- मी मस्त सुगंधी हवा भरून घेतली छातीत. काय झुळूझुळू वारा
वाहत होता! बेस्ट पिकनिक झाली आजची. माझे शब्द परत घेते मी. विशू, तू पण जरा सॉरी
म्हण सुहासला.
ही बघा, आलीच ट्रेन.
(काही दिवसांनी सगळे चिनूच्या दादाला हा अनुभव सांगतात)
दादा- (कौतुकानं) अरे, कसले भारी आहात तुम्ही! तुम्ही चक्क POWER
नावाचा जीवनकौशल्याचा फंडा वापरलात!
विशू- हो का? काय असतं ते? आम्ही तर फक्त तावातावानं वाद
घातले आणि भांडलो.
दादा (हसून)- मी सांगतो हे काय असतं ते. कुठलाही प्रॉब्लेम
सोडवण्यासाठी हे POWER नावाचं मॉडेल उपयोगी पडतं. यातला P म्हणजे काय प्रॉब्लेम
आहे हे शोधून काढणं. O म्हणजे ऑप्शन अर्थात पर्याय. मग हे पर्याय Weigh करायचे,
म्हणजे त्यांच्या ब-या-वाईट पैलूंचा आढावा घ्यायचा. पुढचं E म्हणजे Elect आणि
Execute, म्हणजे त्यातला योग्य पर्याय शोधून वापरायचा. शेवटचा R आहे Review साठी.
आपण निवडलेला पर्याय बरोबर होता का नाही यावर विचार करणं.
बघा, तुम्हांला नाही वाटत तुम्ही तुमच्याही नकळत या पाय-या वापरल्यात
म्हणून?
सुहास- अं, पटतंय मला
तुझं. जरा बघूयात का? आमचा प्रॉब्लेम असा होता की आम्ही एका अनोळखी जागी चुकून
पोचलो होतो. आमच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. काहीजण रागावले, काहीजण रुसले
तर काहींना चक्क आनंद झाला. त्यामुळे प्रत्येकानं पर्यायही निरनिराळे सुचवले. उदा.
हताश होऊन स्टेशनवरच बसून राहावं, परतीच्या बसची किंवा ट्रेनची सोय करावी,
कुणाकडून तरी लिफ्ट घ्यावी किंवा तिथेच कुठेतरी पिकनिक करावी.
जीतू- पण स्टेशन वर बसून
राहण्यानं उलट आम्हांला आणखी वाईट वाटत राहिलं असतं. ताबडतोब परतलो तर पिकनिकच्या
मजेवर पाणी सोडायला लागलं असतं. कुणा अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागणंही तसं धोक्याचंच
होतं. आणि मोबाईल फोन नसल्यामुळे इंटरनेटचा आधार घ्यायचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या
त्यात सुरक्षित आणि योग्य पर्याय तिथे पिकनिक करण्याचा होता, तो आम्ही निवडला.
सुहास- हो, आणि नशिबानं आम्ही बाबांना कळवू शकलो, त्यामुळे आमचं टेन्शन कमी झालं. मोबाईल फोन न
नेण्याचा निर्णयही शेवटी फायद्याचाच ठरला कारण आम्हांला त्या सगळ्या वातावरणाचा
नीट अनुभव घेता आला.
चिनू- एकूण काय, आम्ही
परफेक्ट निर्णय घेतले म्हणायचे! एकदम खास झाली आमची पिकनिक.
दादा- हं, आता विसरू नका
हे POWER मॉडेल. हा जादूचा मंत्र वापरून तुम्ही कुठल्याही समस्या सोडवू शकता. मग ते करियर निवडणं असो की परीक्षेची तयारी
असो; मित्राशी झालेलं भांडण असो की अगदी आज कुठला ड्रेस घालू असा पडलेला प्रश्न
असो.
प्रिय वाचकमित्रांनो, हा
आहे तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम. तुम्हांला परीक्षेत अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क्स
पडलेत आणि आता तुमचे मित्र तुम्हांला भेटायला येणार आहेत. कसं तोंड देणार त्यांना?
सांगाल की सांगणार नाही? असेल तर कसं? लक्षात ठेवा, त्यातल्या प्रत्येक पर्यायाची
काहीतरी किंमत भरायला लागणार आहे आणि तसेच त्यांचे काही फायदेही असणार आहेत. चालवा
डोकं आणि शोधा पर्याय!