Friday, 19 January 2018

प्रेमातले प्रयोग १

  लोकसत्ता व्हिवा 

शचीला वाटतंय कि तपन तिला अव्हॉइड करतोय आजकाल. गेले काही दिवस ती त्याच्याशी निवांतपणे बोलायचा प्रयत्न करतीये. पण इतके दिवस चुटकीसरशी हाजीर होणारा तपन सापडतच नाहीये तिला. ती खूप घाबरलीये. तपन आणि शची प्रेमात पडले त्याला आता वर्ष झालं. फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर चॅट करता करता आपले विचार जुळतायत असं त्यांच्या लक्षात आलं. मग ते हळूहळू भेटायला लागले, बाहेर जायला लागले. शचीच्या वाढदिवसाला लोणावळ्याला जायचं ठरवलं त्यांनी. परत आल्यावर काही दिवस गेले. शचीची पाळी नेहमीच्या वेळेत आली नाही. काही वेळा थोडाफार उशीर व्हायचा म्हणून तिनं दुर्लक्ष केलं पण तिला सारखी धाकधूक वाटायला लागली. शेवटी तिनं हिम्मत करून फार्मासिस्टकडून प्रेग्नन्सी टेस्ट कीट आणलं आणि युरीन तपासली. ती टेस्ट पॉझिटीव्ह होती. म्हणजे ती प्रेग्नंट होती! आता मात्र तिला खरंच टेन्शन आलंय.


  तुमच्यातल्या कुणावर अशी वेळ आलीये? आपल्यापैकी काही जणांनी शाळेत सेक्स एज्युकेशनचे धडे घेतलेले असतात. बहुतेकांनी इंटरनेटवरून सेक्सविषयी बरीच माहिती मिळवलेली असते, पोर्नोग्राफी पाहिलेली असते. पुस्तकांमधून, इंग्लिश मूव्हीजमधून, मित्र-मैत्रिणींकडून या माहितीत भर पडलेली असते. तरीही समहाऊ स्त्री-पुरुष संबंधांमधलं गुपित कळलेलंच नसतं. तरुणपणात हॉर्मोन्स वाढतात, नवनवीन अनुभव घेऊन पहायची जबरदस्त इच्छा होते. त्यातल्या धोक्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. नव्यानं मिळालेलं स्वातंत्र्य आजमावायचं असतं. काही वेळा आपला मर्दपणा शाबित करायचा असतो तर काही वेळा इतर सगळे करतायत म्हणून हा अनुभव घ्यायचा असतो. कित्येकांचं म्हणणं असतं की ही इतकी नॅचरल गोष्ट आहे आहे तर काय हरकत आहे शरीरसंबंधाचा अनुभव घ्यायला?


  प्रॉब्लेम इतकाच असतो की हक्काच्या या जाणिवेबरोबर त्यातल्या जबाबदारीची जाणीव मात्र आलेली नसते. खरंतर आपल्या आजूबाजूला माहितीचा विस्फोट झालाय. कुठलीही माहिती ‘अॅट द क्लिक ऑफ अ बटन’ मिळू शकते. पण म्हणून सेफ सेक्सविषयी कितीजण माहिती घेतात? तुम्ही म्हणाल, नक्की कशापासून सेफ रहायचं असतं? शरीरसंबंधांच्या वेळी काही काळजी घेतली नाही तर प्रेग्नन्सी, लैंगिक आजार (Sexually Transmitted Infections) आणि लैंगिक अत्याचार असे काही धोके असतात. एग आणि स्पर्म एकत्र येऊन बाळ तयार होऊ शकतं आणि ती मुलगी प्रेग्नंट राहू शकते. असं झालं तर दोन पर्याय असतात. प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची किंवा टर्मिनेट करायची.  दोन्हींमध्ये फायद्यांपेक्षा तोटेच अधिक. बाळ होऊ देण्याचा निर्णय तसा अवघड असतो. कारण ते प्लॅन केलेलं नसतं. बहुतेकवेळा तशी मानसिक आणि आर्थिक तयारीही नसते. गर्भपाताचा निर्णय घेतला तर तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर फक्त तुमची परवानगी चालत नाही, कुणातरी अॅडल्टची सही लागते. शिवाय त्यात अति-रक्तस्त्राव, इन्फेक्शन अशा गुंतागुंती होऊ शकतात. लपून छपून, बेकायदा ठिकाणी  केलेल्या गर्भपाताचे आणखीनच जीवघेणे प्रॉब्लेम्स येतात. नंतर लग्नाच्या वेळी, मूल व्हायच्यावेळी काही नवीन प्रश्न उभे राहू शकतात. त्याशिवाय खर्च, मानसिक त्रास, सुट्ट्या / रजा हे प्रश्न वेगळेच.


 दुसरा धोका लैंगिक रोगांचा. एड्स विषयी काही बेसिक माहिती आपल्याला असायला हवी. हा रोग एकदा झाला की यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. कारण तो पूर्णपणे बरा करणारा उपचार अजून सापडलेला नाही. तो होऊ नये म्हणून कुठली लसही अद्यापपर्यंत तयार झालेली नाही. बाहेरून नुसतं बघून कुणाला एड्स झाला असेल ते सांगता येत नाही कारण ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसू शकते. त्यामुळे धोका अधिकच वाढतो. तुमच्याकडून तुमच्या पार्टनरला, बाळाला हा रोग पसरू शकतो. याव्यतिरिक्त होणा-या गुप्तरोगासारख्या लैंगिक आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार घ्यावे लागतात, दोन्ही पार्टनरना.



  शची आणि तपन, दोघांनीही याविषयी काहीच विचार केलेला नव्हता. त्यांना काही माहितीही  नव्हती. काय बरं माहिती असायला हवी होती त्यांना? जेव्हा दोन व्यक्ती शरीरसंबंधाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यातले किती जण एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करत असतात? बाळ मुलींच्या पोटात वाढतं म्हणून मुलांची काहीच जबाबदारी नाही का? सगळी काळजी, टेन्शन मुलींनीच घ्यायचं का? याविषयी पुढच्या आठवड्यात पाहू. 
Groom slips the ring on the finger of his bride on their wedding day

सेल्फी / किल्फी

व्हिवा लोकसत्ता 

A small bird perched on a branch with yellow withering leavesनार्सिसस ग्रीक होता. तो अतिशय देखणा होता. एके दिवशी त्यानं तळ्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि त्याची तहान भूक हरवली. तो स्वत:च्याच प्रेमात पडला आणि आपलं प्रतिबिंब आयुष्यभर निरखत राहिला.

सेल्फी काढणारे असे अनेक नार्सिसस आपल्या आजूबाजूला दिसतात. आपण कसे दिसतो हे पाहायला आवडतं आपल्याला. कुठलाही ग्रुप फोटो पहिला की आपण पहिल्यांदा स्वतःला शोधतो. पूर्वी फोटो काढायला कुणी तयार व्हायचं नाही कारण जी व्यक्ती फोटो काढायची ती यायचीच नाही फोटोत. पण आता सेल्फीनं ही अडचण सोडवलीये. आता कुठल्याही निवांत एकांत ठिकाणी आपला आपल्याला सहज फोटो घेता येतो, वेगवेगळ्या पोझेसमध्ये, मूडमध्ये, रोमॅन्टिक अवस्थेत! ‘अ पिक्चर स्पीक्स लाऊडर दॅन अ  थाऊजंड वर्डस’ असं म्हणतात. त्यामुळे अनेक जण आपल्याला काय वाटतंय हे लिहिण्याऐवजी सेल्फी पोस्ट करतात. स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रिटीज सेल्फी चा सर्रास वापर करतात. कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम अशा गोष्टींशीही सेल्फीचा संबंध जोडला गेलाय.

आणखीही काही कारणं असतात सेल्फी काढायला. खूप जणांना फिरायला आवडतं, वेगवेगळ्या जागा, निरनिराळे देश पाहायला आवडतात. त-हेत-हेचे पदार्थ चाखायला आवडतात. त्या आठवणी जपायला ही आवडतं. म्हणून ते सेल्फी काढतात. पण फक्त मेमरी जपणं इतकाच उद्देश असतो का त्यात? नाही खरंतर. आपण कुठे कुठे गेलो होतो हे इतरांनाही सांगायचं असतं. त्याशिवाय कुठे चैन पडते आपल्याला? सोशल मिडियावर लाईक्स मिळाल्याशिवाय उपयोग काय सेल्फीचा, हो ना? मग त्यासाठी बॅकग्राउंड फार महत्त्वाची ठरते. मागचा सीनिक व्ह्यू, किंवा आयफेल टॉवर किंवा लंडन ब्रिज दिसायलाच हवा ना? समजा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईट्स नसत्या तर? सेल्फीची क्रेझ तितकीच राहिली असती का?
मग असा स्पेशल व्ह्यू शोधता शोधता अतिरेक होतो काहीवेळा. कुठल्याही टोकाला जायची, धोकादायक जागांपर्यंत पोचायची तरुणांची तयारी असते त्यासाठी.  काही वेळा जीवावर बेततं. सेल्फी काढताना जीव गमावण्याच्या कारणांची ही यादी पहिली तर विश्वास बसत नाही. उंचावरून खाली कोसळणे किंवा पाण्यात बुडणे ही नेहमी सापडणारी कारणं. कुठल्यातरी इमारतीच्या किंवा कड्याच्या अगदी काठावर जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात सुरक्षिततेचं भान सुटतं. कधी ट्रेनच्या वरती उभं राहून फोटो काढताना वरच्या विजेच्या वायरचा शॉक बसून जीव जातो. धबधब्याच्या, नदीच्या किंवा समुद्राच्या कडेशी उभं राहून फोटो काढणे, बोटीत फोटो काढण्याच्या नादात बोट उलटणे अशा गोष्टींमुळे अनेकजण बुडतात. येणा-या ट्रेनच्या समोर उभं राहून सेल्फी काढण्याची आयडिया ज्याला सुचली असेल तो तर खरोखरच धन्य आहे. जंगली प्राण्याबरोबर फोटो काढताना (अस्वल, साप, बिबट्या वगैरे), ड्रायव्हिंग करताना, इतकंच नव्हे तर कानापाशी रिव्हॉल्व्हर धरून सेल्फी काढताना अचानक गोळी उडूनही माणसं मरण पावलीयेत. त्यावरून ‘किल्फी’ किंवा किलर सेल्फी हा शब्द वापरात आलाय.

अशी धोका घेण्याची सवय मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये जास्त असल्यानं सेल्फी डेथ्स फिमेल्स पेक्षा यंग मेल्स मध्ये जास्त दिसतात.
अर्थातच हे टाळण्यासाठी अवेअरनेस हवा. पण इतर अनेक गोष्टींप्रमाणे याही बाबतीत आपण टेक्नॉलॉजीच्या मागे आहोत. म्हणजे अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी अव्हेलेबल आहे पण ती हाताळण्याइतकी मॅच्युरिटी कुठेय? मग कायद्याला मध्ये पडावं लागतं. अनेक टुरिस्ट स्पॉट्समध्ये धोकादायक ठिकाणं ‘नो सेल्फी झोन्स’ म्हणून डिक्लेअर केली गेलीयेत.  

नुकताच पंधरा ऑगस्ट झाला. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं देशप्रेम व्यक्त केलं. (तिरंग्याबरोबर सेल्फी काढून मिडिया वर टाकले.) पण तुम्हांला माहितेय का, की काही आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त सेल्फी डेथ्स आपल्या भारतात होतात? आपला देश अशा गोष्टींमध्ये नको ‘नंबर वन’, नाही का?




काम आणि लैंगिक शोषण

लोकसत्ता व्हिवा 

An overhead shot of a table with a MacBook, flowers, colorful strings and scissors on it‘नमिता, लक्ष कुठे असतं तुझं हल्ली? किती चुका होतायत? इथे क्लायंट माझं डोकं खातोय. यू बेटर इम्प्रुव्ह युवरसेल्फ.’  वॉसच्या केबिनमधून नमिता कशीबशी बाहेर आली. लंच अवर झाला होता पण तिला काही खावंसंच वाटेना. टेबलावर डोकं ठेवून ती पडून राहिली.  मेघालीनं जाताजाता हाक मारली  तरी तिनं दुर्लक्ष केलं.  सगळे परतले तरी ती तशीच बसलेली पाहून मेघालीला तिची काळजी वाटली. ‘काय गं, बरं वाटत नाहीये का? जेवायला का आली नाहीस?’ आता मात्र नमिताला इतकं रडू आलं की आवरेचना.  मेघाली तिला बळेबळे कॉफीशॉपमध्ये घेऊन गेली. ‘हं, आता बोल. काय झालं? बॉस ओरडले म्हणून रडतेयस का? जाऊ दे गं, लक्ष नको देऊस. बाय द वे, आजकाल समीर सारखाच तुझ्याविषयी बोलत असतो हं. काय भानगड आहे? ’


‘समीर’ हाच प्रॉब्लेम होता नमिताचा.  ती नवीन जॉईन झाली तेव्हा खरंतर त्यानं खूप मदत केली तिला. एकदा दोनदा कामासाठी उशिरापर्यंत थांबायला लागलं तर तोही सोबतीसाठी थांबला. मग एकदा कॉफी प्यायला बाहेर चल म्हणाला. ती नाही म्हणाली तसा बिथरला.  तेव्हापासून सारखा तिला त्रास द्यायला लागला.  तिच्याबद्दल बॉसकडे तक्रार करायची, शॉर्ट डेडलाईन असलेल्या असाईनमेंटस द्यायच्या, सगळ्यांसमोर पाणउतारा करायचा.... आता तर त्यानं सगळीकडे पसरवलं की नमिता त्याच्या मागे लागली आहे म्हणून. कारण नसताना सगळे तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागले. नमिता अगदी वैतागून गेली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा कात्रीत सापडली ती. आज शेवटी मेघालीशी शेअर केलं तिनं. ‘अग, मग आधी का बोलली नाहीस कधी?’


A woman in a dress standing on a rock on the coast with waves crashing against the nearby rocks
कामाच्या ठिकाणी हे असं शोषण होणाऱ्या स्त्रियांपैकी सत्तर टक्क्यांहून अधिक गप्प बसतात. जर त्यांनी आवाज उठवलाच तर त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील, आपली नोकरी जाईल अशीही भीती त्यामागे असू शकते. बॉसच जर असं वागत असेल तर तो आपल्यावर डूख धरेल, आपल्याला त्रास देईल असं वाटतं.  काही वेळा स्त्रियांना न्याय मिळतोही पण त्यासाठी जबर किंमत भरावी लागते. सहकारी त्यांच्याकडे निराळ्या नजरेनं पाहू लागतात, नवरा शंका घेऊ लागतो, त्यांच्याबाबत गॉसिप केलं जातं.
कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण हा सध्या ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. स्त्रियांना अवघड वाटेल असे शेरे मारणे, त्यांच्या कपड्यांवर, दिसण्यावर टिपणी करणे, सहेतुकपणे स्पर्श करणे, अस्वस्थ वाटेल इतक्या जवळ येणे, अश्लील चित्रे दाखवणे इथपासून ते प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार अशा सगळ्याचा यात समावेश होतो. का होतं हे? याला जबाबदार आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती. दु:खाची गोष्ट अशी कि अनेक पुरुषांना हे शोषण वाटतच नाही. नुसती आपली एक गंमत म्हणून ते याकडे पाहतात. बहुतेकांना असं वाटतं कि ‘एवढा आरडा-ओरडा करण्यासारखं काय आहे त्यात? हातच धरला होता ना?’ काही जणांना तर तो आपला हक्क वाटतो.  त्या स्त्रीच्या कामावर याचा परिणाम होतोच, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही जबरदस्त परिणाम होतो.  शारीरिक आणि मानसिक तब्ब्येत बिघडते. नैराश्य, चिडचिड, निरुत्साह अशा नकारात्मक भावना व्यापून टाकतात.  सगळ्या मानवजातीवरचा विश्वास उडाल्यासारखा वाटायला लागतो.


Image result for sexual harassment at workplace२०१३ मध्ये यावर कायदा झाला, ‘The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013नावाचा. त्याआधी विशाखा नावाचा कायदा होता. या नवीन कायद्यामुळे स्त्रियांना बरंच संरक्षण मिळालंय. दहाहून अधिक कामगार असलेल्या ठिकाणांमध्ये यासाठी एक कमिटी स्थापन करणं आवश्यक केलंय.  लैंगिकदृष्ट्या काही त्रास झालं तर या कमिटीकडे तक्रार करता येते. त्यावर पूर्ण तपास करणं या कमिटीवर बंधनकारक असतं. तपासादरम्यान तुमचं नाव गोपनीय ठेवलं जातं. शिवाय काही त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती कामाची जागा बदलली जाते.



लैंगिक शोषण झालं आहे कि नाही हे कोण ठरवणार? कायदा याबाबत अगदी स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्याचं मत महत्त्वाचं धरलं जातं. म्हणजे समजा एखाद्या स्त्रीला काम करत असताना मशीनचा थोडा धक्का लागला आणि तिच्या पुरुष सहकाऱ्यानं तिचा हात धरून त्यावर फुंकर घातली, त्यानिमित्तानं तिला जवळ घेतलं, तर ते लैंगिक शोषण होईल का? होऊ शकेल, जर ते तिला त्रासदायक, embarasing वाटलं, अप्रस्तुत वाटलं तर. तो म्हणेलही, कि मी फक्त मदत करत होतो, पण तिला काय वाटलं हे जास्त महत्त्वाचं.


मनात येणारी एक शंका म्हणजे स्त्रिया याचा गैरफायदा घेतील का? हे अगदीच अशक्य नाही, पण या घटकेला तरी स्त्रियांचं तक्रार करण्याचं प्रमाण इतकं कमी आहे की त्यांना तक्रार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवंय. शिवाय त्यांच्या तक्रारीची पूर्णपणे चौकशी झाल्याशिवाय कारवाई केली जात नाही.

इतर सर्व माणसांसारखेच स्त्रियांना काही बेसिक हक्क आहेत. या मानवाधिकारांचा आदर आपण करायला हवा. फक्त पुरुषांनीच नव्हे तर स्त्रियांनीही इतर स्त्रियांच्या मागे उभं राहायला हवं. अशी वेळ कुणावरही येऊ शकते. नाहीतर स्त्रीस्वातंत्र्याचं स्वप्न हे स्वप्नंच रहायचं.

  

                       

पीडीए

लोकसत्ता व्हिवा जुलै ६

शहराच्या शांत भागातली ती सोसायटी. अनेक इमारती आणि आजूबाजूला भरपूर मोकळी जागा. त्यात स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, क्लब हाउस, घसरगुंड्या, झोपाळे असं सगळं. संध्याकाळी सगळीकडे गजबजाट असायचा, लहान मुलं, टीनएजर्स खेळत नाहीतर गप्पा मारत असायचे. पण दुपारच्या वेळी मात्र सगळा शुकशुकाट असायचा. एका अशाच शांत दुपारी आठव्या मजल्यावरच्या आजींना जिन्यात काहीतरी आवाज ऐकू आला. त्यांनी सिक्युरिटीला फोन करून बोलावलं. तर तिथं कॉलेजला जाणारी दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले दिसले, काहीशा ऑकवर्ड स्थितीमध्ये. ‘काय रे, लाजा नाही वाटत तुम्हांला? काही स्थळ-काळ बघाल कि नाही? आई-वडिलांना सांगायला पाहिजे तुमच्या. ही आजकालची मुलं म्हणजे वाट्टेल ते चाळे करत असतात.’ जमलेल्या प्रत्येकानं आपलं काही ना काही मत व्यक्त केलं. यावर त्यातली मुलगी म्हणाली, ‘तुम्हीच सांगा मग आम्ही कुठं बसायचं ते!’


प्रेमात पडलेल्यांनी कुठे बसावं हा एक प्रॉब्लेमच झालाय. बागेत, झाडामागे, बीचवर असे भेटतात मग ते कुठेकुठे. शाळा-कॉलेज मधले जिने, मैदानं, कॅंटीन, रिकामे वर्ग... सगळ्या जागा एक्स्प्लोअर करून होतात. पूर्वी पार्क म्हटलं की खेळणारी, इकडून तिकडे पळणारी मुलं डोळ्यासमोर यायची. आता मात्र वेगळंच चित्र उभं रहातं.
पीडीए किंवा पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन याचा शब्दशः अर्थ म्हणजे प्रेमाचं जाहीर प्रदर्शन! हे आपण सिनेमात पाहतो, आजूबाजूला पाहतो. व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी बाजारातही पहातो. शिवाय आजच्या टेक्नो युगात व्हर्चुअल जग याततरी मागे कसं राहील? फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, इतर सोशल मिडीयावर कितीतरी लोक सतत एकमेकांबद्दल लिहितात, फोटो टाकतात. रिलेशनशिपच्या स्टेट्स प्रमाणे त्याचं स्टेट्स बदलत राहतं. इतकं की ब्रेक अप झालेलं पार्टनरला या स्टेट्स वरून पहिल्यांदा कळतं. तुम्ही जर प्रेमात पडला असाल आणि तुमचं फेसबुक स्टेटस बदललं नाहीत तर लोक ‘तुम्ही प्रेमात नाहीच आहात’ असं म्हणायला कमी करणार नाहीत.
प्रेमाची ही जाहिरात काहीवेळा बाकीच्यांना खिजवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठीही  केली जाते. आणि काही जण तर आपलं प्रेम दाखवण्याऐवजी यातून आपला अधिकारच दाखवत असतात. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा वापर अगदी नकोसा, केविलवाणा वाटतो.


मिडीयामध्ये दाखवलेलं प्रेम, मुव्ही स्टार्सचा पी डी ए आपण सहजपणे खपवून घेतो. प्रत्यक्षातही बहुतेकांचं एकमत असतं की पब्लिकमध्ये हात धरणे, एकमेकांकडे प्रेमाने पहाणे, हग करणे इथपर्यंत ठीक आहे. फक्त त्याला काही मर्यादा हवी. काही जणांना मात्र अजिबात नाही पटत हे असं खाजगी गोष्टी सगळ्यांसमोर करणं. बरोबर-चूक म्हणण्यापेक्षा हा ज्याच्या त्याच्या कम्फर्ट लेव्हल चा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी, ज्या जनरेशनमध्ये, ज्या कल्चरमध्ये आपण वाढतो, त्याप्रमाणे आपली सहनशक्ती ठरते. वेस्टर्न देशांमध्ये सार्वजनिक स्पर्श सर्वमान्य आहे. रस्त्यात एकमेकांचा हात धरणं, एकमेकांना स्पर्श करणं हे अगदी सहजपणे केलं जातं. कुणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यांचं लग्न नवरा-नवरीनं एकमेकांना किस केल्याशिवाय पूर्णच होत नाही. आपल्या देशात मात्र नियम वेगळे आहेत. एकवेळ दोन मुलगे किंवा दोन मुली गळ्यात गळे घालून फिरले तर ते चालतं. पण मुलगा-मुलगी असतील तर त्यांनी अंतर ठेऊन रहावं अशी अपेक्षा असते. कदाचित कोणताही स्पर्श हा सेक्शुअल असतो असं काहीसं आपल्याला वाटत असावं.


 पीडीए चेही काही नियम असतात. कपल मधल्या दोघांची त्याला मान्यता असायला हवी. तुमच्या दोघांबरोबर आणखी एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल आणि तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसलात तर त्या तिस-या व्यक्तीला किती ऑकवर्ड वाटेल याचाही विचार करायला हवा. आजूबाजूला वयस्कर लोक किंवा लहान मुलं असतील तर मनाला आणि हातांना थोडा लगाम घालायला हवा. थोडक्यात तुमच्या अॅक्शनमुळे तुम्हाला कसं वाटतं याचबरोबर त्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे महत्त्वाचं आहेच की.


Image result for public display of affectionआणि कायदा काय म्हणतो? कायदा काहीसा व्हेग आहे याबाबतीत. यासाठी इंडियन पिनल कोड चं कलम २९४ आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करायला यानुसार बंदी आहे. पण अश्लील चाळे म्हणजे नेमके कोणते हे स्पष्ट केलेलं नाहीये. अनेक तरुणांना असा काही कायदा आहे हीच कल्पना नसते. म्हणजे आपण कशापासून जपून राहायला हवं हे माहिती नसतं. आणि कुणी मनाविरुद्ध असा त्रास दिला तर आपण पोलिसांकडे तक्रार करू शकतो हेही. क्वचित कधी या कायद्याचा गैरवापर होऊन एखाद्याला विनाकारण त्रास होतो. काही सो-कॉल्ड समाजसुधारक ही समाज ‘स्वच्छ’ करायची जबाबदारी सिन्सीअरली पुरी पाडत असतात.


एक नक्की की आजची तरुणाई या जवळीकीकडे सहजपणे पहातेय. भेटल्यावर एकमेकांच्या गळ्यात पडणं, खांद्यावर हात टाकणं, टाळया देणं यात तुम्हांला वावगं वाटत नाही. फक्त प्रेमाचा हा डिस्प्ले सेक्शुअल होत नाहीये ना आणि त्यातून प्रेम दिसण्या ऐवजी प्रेमाचं ओंगळ प्रदर्शन होत नाहीये ना याविषयी सावध नक्कीच राहायला हवं, हो ना?

Monday, 1 January 2018

बीइंग ह्युमन


लोकसत्ता व्हिवा नोव्हेंबर २०१७ 

   लंडन च्या बसेसमध्ये ‘गुड मॉर्निंग लेडीज अँड जंटलमेन’ असं म्हणण्याऐवजी ‘गुड मॉर्निंग एव्हरीवन’ असं म्हणणार आहेत आता. सतत तुमच्या जेन्डर विषयी आठवण करून न देता फक्त एक माणूस म्हणून वागवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून.

 परवा रेडिओवर एक जुनं गाणं लागलं होतं, पुरुषांनी कसं असायला हवं हे सांगणारं. त्यात अनेक तेजस्वी शब्द होते- मर्द, लढवय्या, शूर-वीर, तलवार घेऊन लढणारा, क्रांतीसाठी फासावर जाणारा...  
आणि त्यातलंच मुलींचं वर्णन होतं, पवित्र, सुंदर, डोक्यावरून पदर घेतलेली,  लाजरी-बुजरी...
   माझी खात्री आहे की आजच्या जमान्यातले माझे तरुण मित्र-मैत्रिणी हे वाचून एकतर शरमेनं लाल झाले असतील किंवा रागानं लाल  झाले असतील.

   स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गानं फरक जरूर ठेवलेयत, त्यामागं काही हेतूही आहे निसर्गाचा.  अगदी पूर्वी, माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ होता तेव्हा तोही तितपतच हे फरक पाळायचा. पण हळूहळू मानव सुधारला, समाज तयार झाला, त्याचे नियम तयार झाले. नैसर्गिक नियमात समाज एक एक भर टाकत गेला.  मग काही कामांना, भावनांना, वर्तनांना, पोशाखांना बायकी, पुरुषी अशी लेबलं लावली गेली.  काही काळानं तर या नियमांचं प्रस्थ इतकं वाढलं की ते विकृत वाटावे इतके कठोर झाले.

   आजच्या मॉडर्न काळात आपल्याला या सगळ्याची इतकी सवय झालीये, की त्यात काहीच विचित्र वाटत नाही. मुलांनी मस्ती केली, मोडतोड केली, मारामारी केली तर आपण म्हणतो, ‘जाऊ दे हो, मुलगा आहे ना तो! बॉईज विल बी बॉईज!’ दंगामस्ती, दमदाटी हे सगळं खपवलं जातं मुलगा आहे या नावाखाली. गम्मत अशी की फक्त अशा नकारात्मक वागण्यासाठीच हे तत्व वापरलं जातं; प्रेम, माया, काळजी, जबाबदारी अशा सकारात्मक वागणुकीसाठी नाही.

   अमेरिकन शाळांमध्ये गोळीबार होतात. त्यातले किती गोळीबार मुली करतात? अशा हिंसक वर्तनाची सुरुवात मुलांच्या लहानपणच्या खेळण्यांमधून होत असेल का? साधी रंगांची पिचकारीसुद्धा आता बंदुकीची असते. कुठल्याही व्हिडीओ गेममध्ये किती माणसं मारली यावरच तर पॉईंटस मिळतात. नजर मरत असेल ना मुलांची! प्रत्यक्ष माणूस मारताना काहीच वाटत नसेल त्यांना.

Image result for gender
   आणि तरीही या टिपिकल व्याख्येच्या बाहेर कितीतरी मुलगे असतात. काही हळवे असतात, काही  समजूतदार असतात. काही मुलांना पटकन रडू येतं, काहींना मारामारी, झटापट आवडत नाही. काहींना डान्स, कविता, हेअर स्टाईल अशा गोष्टी करायला आवडतात. पण त्यांना सुखानं करता येतं का ते? लगेच त्यांच्या मर्दपणावरच शंका घेतली जाते. ‘शी:, किती बायकी आहे तो!’, ‘कसलं हे वागणं, शोभतं का पुरुषाच्या जातीला?’, ‘पुरुषासारखे पुरुष तुम्ही, आणि हे काय काहीतरीच!’ बायकोला मदत करणा-या पुरुषाला ‘बायल्या, बायकोच्या ताटाखालचा मांजर’ अशी शेलकी विशेषणं मिळतात. हळुवार असलेल्या एखाद्या मुलाला आपल्यात ही चांगली क्वालिटी आहे असं वाटण्यापेक्षा काहीतरी खोट आहे असंच वाटणार. किती अन्यायकारक आहे हे खरं तर!
   मार्गारेट मीड नावाच्या विदुषीनं म्हटलंय,  पुरुषांना नुसतं पुरुष म्हणून जन्माला येऊन  पुरेसं नसतं, त्यांना आपलं पुरुषपण सिद्ध करायला लागतं. मुलं हे सिद्ध करण्यासाठी काहीही करतात. दादागिरी, जोरात गाडी चालवणं, इथपर्यंतच हे थांबत नाही. तर स्मोकिंग करणं, दारू पिणं, वेश्यांकडे जाणं अशा जीवघेण्या टोकांपर्यंतही जातात मुलं. अजून मोठं झाल्यावर बायकोला मारणं, भरपूर पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते मार्ग चोखाळणं अशा कृत्यांमधून ते आपली ही स्टिरीओटिपिकल भूमिका पार पाडतात. हे अपेक्षांचे साचे इतके ठाशीव आणि सार्वत्रिक असतात की त्यांच्यातून बाहेर पडण्याची, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याची कल्पनाही मनात येत नाही.

      स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे एकमेकांच्या विरूद्धच असायला हवेत का? त्यांच्यातला फरक स्वीकारून, उच्च-नीचतेच्या पलीकडे जाऊन केवळ एक माणूस म्हणून विचार करायला जमेल का आपल्याला? आणि त्यासाठी परंपरागत लिंगभेदाच्या कल्पनांच्या जळमटांमधून बाहेर यायला जमेल का?



Image result for gender
   एक मात्र नक्की, पुरुषत्वाची व्याख्या बदलायला हवीय. मर्दपणा म्हणजे माज नव्हे तर आत्मविश्वास, फुकाचा उच्चपणा नव्हे तर समाधान देणारी समानता, विध्वंसक कुरघोडी नव्हे तर सकारात्मक सहकार्य! आणि हे पुरुषांचा पाणउतारा करण्यासाठी नव्हे तर त्यांना जास्त फुलफिलिंग आयुष्य जगता येण्यासाठी, एक माणूस म्हणून जगता येण्यासाठी!





  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...